उपमुख्यमंत्र्याची महारेलसोबत सकारात्मक चर्चा
नीरा : पुणे-मिरज लोहमार्गावरील नीरा (ता. पुरंदर) येथील रेल्वेच्या हद्दीत भुयारी मार्ग करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांचे शुक्रवारी (दि. 5) होणारे आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे स्थानिक रहिवाशांच्या वतीने सांगण्यात आले.
नीरा येथील रेल्वेच्या हद्दीत भुयारी मार्ग व्हावा या मागणी संदर्भात बुधवारी (दि. 3) उपमुख्यमंत्री अजित पवार व महारेलचे कार्यकारी संचालक राजेशकुमार जयस्वाल यांच्यामध्ये मंत्रालयात सकारात्मक बैठक झाली. तसेच गुरूवारी (दि.4)नीरा ग्रामपंचायतीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच याजेध काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप हे नीरा येथील रेल्वेच्या पश्चिमेकडील लोकवस्ती,
मशीद व शेतीकडे जाणार्या रस्त्याबाबत रेल्वेच्या विभागीय् व्यवस्थापकांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे आत्मदहन आंदोलन थांबविण्यात यावे अशी लेखी विनंती केली. या पार्श्वभूमीवर आत्मदहन आंदोलन काही दिवसांसाठी तात्पुरते स्थगित करीत असल्याचे हाजी सद्रुद्दीन शेख, सिकंदर शेख यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
रेल्वेच्या जागेची मोजणी करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महारेलचे कार्यकारी संचालक राजेशकुमार जयस्वाल यांना नीरा येथील रेल्वेच्या हद्दीत भुयारी करण्याबाबत तसेच नीरा येथील रेल्वेच्या जागेची मोजणी करण्याच्या सूचना केल्या. यावेळी महारेलचे राजेशकुमार जयस्वाल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच येत्या 10 दिवसांत पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक व संबंधितांची बैठक घेऊन नीरा येथील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे यांनी दिली.