नगर – जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचासह सदस्यांच्या सर्वात्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. यापैकी 184 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विद्यामान सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत उपसरपंचाची निवड होणार आहे. या निवडणुकीत सरपंचाला देखील मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सदस्यांना उपसरपंच पदाचे वेध लागले असून त्यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.
नवर्निर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार असली तरी ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी वर्ग दोनच्या राजपत्रित अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये नायब तहसीलदार, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपअधीक्षक भूअभिलेख, सहाय्यक अभियंता, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांचा समावेश आहे.
वडगाव गुप्ता, कान्हूरपठार, पोहेगाव, पुणतांबा, लोणी व्यंकनाथ, मुकिंदपूर, आश्वी खुर्द व बुद्रुक आदीसह 194 ग्रामपंचायतींच्या 5 नोव्हेंबर 2023 रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 17 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायतींत विजयी झालेले सरपंच आणि सदस्यांची यादी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी प्रसिद्ध केली.
या ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे थेट जनतेतून निवडऊन आलेले आहेत. त्यामुळे आता उपसरपंच पदाची निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सरपंचपदाच्या निवडीसाठी पहिली सभा आयोजित करण्याचे निर्देश निवडणूक यंत्रणेला दिले आहेत.
उपसरपंचपदाची निवडणूक 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची निवडणूक होणार आहे.
त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी वडगाव गुप्ता, कान्हूरपठार, लोणी व्यंकनाथ, आश्वी खुर्द व बुद्रुक, फत्याबाद, यासह 122 ग्रामपंचायतींच्या 24 नोव्हेंबर रोजी पोहेगाव, पुणतांबा, टाकळीमियॉं, मुकिंदपूर यासह 55 ग्रामपंचायतींच्या तर 25 नोव्हेंबर रोजी 6 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाची निवडणूक होणार आहेत. उर्वरित 10 ग्रामपंचायतींचा डिसेंबर महिन्यात कालावधी संपणार आहे. कालावधी संपताच तेथील उपसरपंचाची निवडणूक घेतली जाणार आहे.