डॉ. भास्करराव मोरे यांची मागणी
जामखेड (प्रतिनिधी) – शहरात खासगी कोविड सेंटर सुरू करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. पण या सेंटरला शासनाने परवानगी देताना आवश्यक सुविधा व जागेची पाहणी करावी. तसेच कोविड केंद्र हे वर्दळीच्या ठिकाणी नसावे, अशी मागणी डॉ. भास्करराव मोरे यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी मंगेश सुधीर मोरे, प्रशांत कानडे, अविनाश कोळपकर उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले, नगर जिल्ह्यातील जामखेड-कर्जत हा दुष्काळी व अविकसित भाग असल्यामुळे लोकांचे वार्षिक सरासरी उत्पन्न सर्वसाधारण उत्पन्ना पेक्षा कमी आहे. तसेच इतर तालुक्यांच्या तुलनेत आरोग्य सुविधा कमी आहेत.
तालुक्यात एकही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. अशा परिस्थितीत तालुक्यात कोविड हॉस्पिटल सुरू होत आहेत, ही दिलासादायक बाब आहे. मात्र कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी परवानगी देण्यापूर्वी आपण शासन निर्णयानुसार उपलब्ध बाबींची खातरजमा करावी. कोविड सेंटर सुरू करताना सदर ठिकाणी वर्दळ नसावी. तसेच आवश्यक बाबींची पडताळणी करूनच कोविड हॉस्पिटल सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.