सुरत – भारताच्या अंध क्रिकेटपटूंच्या संघातील अव्वल खेळाडू भालजी डमोर याच्यावर गुरे राखण्याची वेळ आली आहे. करोनामुळे हाती काम मिळत नाही व रोजगाराचे अन्य कोणतेही साधन नाही अशा परिस्थितीमुळे एकेकाळी अंध क्रिकेट संघाकडून 1998 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत अव्वल कामगिरी केलेल्या भालजीसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1998 साली झालेल्या अंधांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीमुळे कधीकाळी हिरो बनलेला हा खेळाडू सध्या गुजराण करण्यासाठी म्हशी राखत आहे. भालजी एक अष्टपैलू क्रिकेटपटूम्हणून ओळखला जात होता. त्याच्या कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघाने उपांत्यफेरीही गाठली होती. त्यावेळी भालजीसह संर्व संघाचा सन्मान तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याहस्ते करण्यात आला होता.
त्यावेळी त्याच्या कामगिरीमुळे प्रभावीत होऊन तत्कालीन गुजरात सरकारने त्याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, गेल्या 19 वर्षांत या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही. भालजीने अंधांच्या क्रिकेटमध्ये 125 सामने खेळताना 3 हजार 125 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीतही चमक दाखवताना 150 बळी मिळवले आहेत. क्रीडा कोटा किंवा अपंगांच्या कोट्यातूनही त्याला आजवर नोकरी मिळालेली नाही. अखेर घर चालविण्यासाठी त्याला गुरे राखण्याचे काम करावे लागत आहे. त्याच्या परिचयाच्या एका सामाजिक संस्थेशी निगडीत व्यक्तीने भालजीच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.