नगर – कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाचे सहसचिव डॉ. सुदिन गायकवाड यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढला. किरण देशमुख यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी यांच्या मागणीवर वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यास किरण देशमुख हे सक्षम ठरले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांनी शेतीसाठी सीना धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या मागणीवर कार्यवाही न झाल्याने नगर जिल्हाधिकारी कार्यालयात १२ फेब्रुवारीला यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीत माजी पालकमंत्री शिंदे हे आक्रमक झाले होते. कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याविरुद्ध निलंबनाची मागणी त्यांनी लावून धरली होती. परंतु कारवाई झाली नाही. यावरून त्यांनी नगर जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनामधील विसंगत कारभारावरून सत्ताधारी भाजप अंतर्गत कलह समोर आला.
दरम्यान, आज कालवा समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे होत आहे. या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे देखील दाखल झाले आहेत. बैठक सुरू होताच कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला.