पुणे – कात्रज- कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने राज्यशासनाकडे २०० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी नगरोत्थान योजनेतून दिला जाणार असून, त्यासाठी महापालिकेने शुक्रवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसमोर सादीकरण केले.
महापालिकेने वर्षभरापूर्वी शासनाकडे या निधीची मागणी केली होती. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी वारंवार हा निधी मंजूर झाल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्यापही हा निधी महापालिकेस मिळालेला नाही. या चार किलोमीटरच्या रस्त्याचे ८४ मीटर रुंदीकरणाचे काम पालिकेने सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हाती घेतले आहे. मात्र, भूसंपादनाअभावी ते रखडलेलेच आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकने यांच्यासह पथ विभाग तसेच भूसंपादन विभागाच्या अधिकार्यांनी हे सादरीकरण केले. महापालिकेने शासनाच्या सूचनेनुसार, या रस्त्याचे रूंदीकरण ५० मीटर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भूसंपादनाचा खर्च २८७ कोटींवर आला. हा निधी नंतर महापालिकेने शासनास मागितला. मात्र, शासनाने २०० कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविली असून ८७ कोटींचा खर्च महापालिका करणार आहे. मात्र, शासनाकडे हा निधी देण्यासाठी राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद नसल्याने शासनाकडून केंद्रशासनाच्या नगरोत्थान योजनेतून निधी प्रस्तावित केला आहे. त्यासाठी हे सादरीकरण करण्यात आले.
…म्हणून रखडला रस्ता
कात्रज चौक ते खडी मशिन हा रस्ता ३० मीटर आहे. महापालिकेकडूनहा रस्ता ८४ मीटर रूंद केला जाणार होता. मात्र, या रस्त्त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी सुमारे ७१५ कोटी रु. खर्च येणार होता. मात्र, या जागा टीडीआर तसेच एफएसआयच्या बदल्यात पालिकेस मिळतील, असे गृहीत धरत काम सुरू झाले. लोकांनी रोख मोबदला मागितल्याने हा रस्ता रखडला होता.