अकोले – जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या समशेरपूर येथील अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी पांडुरंग बाळू सदगीर याच्या अंगावर गेट पडल्याने मृत्यू झाला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना अकोले पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याशी पालकांच्या उपस्थितीत संवाद साधला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या भावाला संस्थेत नोकरी व आर्थिक मदत जाहीर केली.
फोनवर शिक्षणमंत्री केसरकर यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या भावाला संस्थेत नोकरी लागावी म्हणून स्पेशल केस करून नोकरी दिली जाईल, असे सांगितले. जिल्हा मराठा संस्थेचे सचिव जे.डी खानदेशी यांनीही दूरध्वनीवरून सर्व पालकांसमोर संवाद साधला असता त्यांनी संस्थेच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी समशेरपूर केंद्राचे केंद्रप्रमुख नवनाथ वणवे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पंडित नेहे, दत्ता जाधव, पोपट दराडे, बबनराव सदगीर, शिक्षक बॅंकेचे व्हा.चेअरमन बाळासाहेब मुखेकर,सरपंच अविनाश गावंडे, संजय मुखेकर, महेश पवार, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.