मायणी – कलेढोण (ता. खटाव) येथे अवैधरित्या दारु विकणार्या व्यावसायिकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्ते दशरथ बुधावले यांनी केली आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निवेदने दिली आहेत. मात्र, पोलिसांकडून थातुरमातूर कारवाई होत असल्याने, संबंधित व्यावसायिक पुन्हा त्याच ठिकाणी दारू विक्री सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी, असे बुधावले यांनी निवेदनात म्हटले आहे.
कलेढोण एसटी स्टँड परिसर आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी चार ते पाच जण अवैधरित्या दारु विक्री करत आहेत. दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्यात लेखी, तोंडी तक्रारी केल्यावर, तात्पुरती कारवाई केली जाते. सकाळी पोलिसांनी कारवाई केलेले हे व्यावसायिक संध्याकाळी गावात ताठ मानेने परत येतात. तक्रारदारास दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी देतात, असेही या निवेदनात म्हटले आहे.