सोमाटणे – संत तुकाराम साखर कारखान्याकडून भंडारा डोंगर येथील संत तुकाराम महाराज मंदिरासाठी सुमारे एक कोटी २५ लाख रुपये देणगी म्हणून देण्यात आली आहे. ही देणगी ऊस उत्पादक शेतकरी, संचालक, सभासद, कर्मचारी आणि कारखाना यांच्या वतीने देण्यात आली आहे. आजपर्यंत या मंदिरासाठी सर्वात जास्त देणगी देणारा हा पहिलाच कारखाना ठरला आहे. अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी दिली.
याबाबत बोलताना भेगडे म्हणाले की, ही देणगी कारखान्याशी संबंधित असणाऱ्या सर्वांनी मिळून दिली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरासाठी आम्ही आणखी लागले तरी देवू. कारखान्याबरोबर ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्यातील कर्मचाऱ्याना आणि व्यवस्थापनाला देणगी द्यावी वाटणे हीच मुळी सुखद गोष्ट आहे. हे संस्कार महाराजांनीच या मातीत पेरले आहेत. जे आज भरभरून उगवून येत आहेत. हिंदू नागरशैलीतील हे मंदिर म्हणजे पुणे जिल्ह्याचे नाव राज्यात आणि देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर अधोरेखित करणारे आहे. अशा मोठ्या देणग्यातूनच हे काम पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचा एक न एक रुपया सार्थकी लागल्याची भावना प्रत्येकामध्ये निर्माण झाली आहे.
अयोध्येत राम आणि भंडारा डोंगर येथील संत तुकाराम या दोन्ही मंदिरात ‘राम’ हा एक समान धागा आहे. भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराज यांचे मंदिर, अयोध्येतील राम मंदिर, गुजरातमधील अक्षरधाम या तीनही मंदिरांचे आर्किटेक्ट एकच आहेत. त्यामुळे हे मंदिरही देशाबरोबर जगात प्रसिद्ध होईल.
संत तुकाराम महाराजांच्या मंदिराला आम्हाला काही तरी करता आले ही बाबच मुळी आमच्यासाठी मोठ्या आनंदाची आहे. कारखान्याचे नाव महाराजांच्या नावे आहे. आज राज्यातील सहकारी साखर कारखाण्यामध्ये आमचा एकमेव कारखाना असेल जो कर्जबाजारी नाही. भविष्यातही होणार नाही. त्यामुळे महाराजांच्या मंदिरासाठी काही करणे हे आमचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
– बापूसाहेब भेगडे, उपाध्यक्ष, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना
संत तुकाराम महाराजांसाठी आम्ही आणखी पैसे द्यायला सुद्धा तयार झालो असतो. महाराज म्हणजे राज्याची अस्मिता आहे.उलट आम्ही भाग्यवान आहोत असे आम्ही समजतो.
– संदीप गराडे, कामगार युनियन अध्यक्ष, संत तुकाराम कारखाना
कारखान्याचे सव्वा कोटी प्राप्त झाले आहेत. कारखाना उत्तरोत्तर प्रगती करतोय हाच महाराजांचा आशीर्वाद आहे. कारखान्याचे आम्हाला सव्वा कोटी जितके महत्वाचे आहेत, तितकेच अगदी गरीब वारकऱ्यांचे, कामगारांचे 10 रुपयेही महत्वाचे आहेत.
– बाळासाहेब काशीद, अध्यक्ष, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट
तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी आमचे अजून पैसे गेले तरी चालतील परंतु हे मंदिर होणे म्हणजे आमच्यासाठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे.
– मंदाकिनी हिरामण पवार, ऊस उत्पादक शेतकरी