नगर – बांधकामांसाठी अत्यावश्यक सिमेंटच्या दरात गेल्या सहा दिवसांत प्रतिगोणी 40 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी सिमेंटच्या कृत्रिम दरवाढीचा परिणाम अनेक घटकांवर होत आहे. सिमेंट दरवाढीतून बांधकाम खर्च वाढला आहे, त्याचा सर्वाधिक सर्वसामान्यांना फटका बसत आहे. सिमेंट पोत्याचा दर हा 330 वरुन 370 रुपयांवर गेला आहे. अर्थात किरकोळ दुकानात 350 वरून 410 रुपयास गोणी मिळत आहे.
सिमेंटची दरवाढ ही नैसर्गिक नव्हे, तर कृत्रिम असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सिमेंट उद्योजकांनी एकत्र येऊन अचानक वाढविलेल्या दरवाढीसंदर्भात सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी बांधकाम व्यावसायिक, सिमेंट ग्राहक यांच्याकडून होत आहे. सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत विविध उद्योगांचा सिमेंटचा दर प्रतिपोते 280 ते 330 रुपयांपर्यंत होता. मात्र, उद्योगांनी अचानक एक ऑक्टोबरपासून सिमेंटच्या दरात वाढ केली. पाच ऑक्टोबरपासून त्याच्या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे.
शहरासह जिल्ह्यात कंपन्यांच्या वितरकामार्फत दरररोज हजारो पोत्यांची विक्री होते. आता प्रत्येकजण आरसीसी घर बांधत असल्याने त्यासाठी सिमेंट गरजेचे आहे.त्यातून सिमेंटचा वापर वाढला आहे. मागणी वाढली आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरसीसी घराचे स्वप्न साकार होत आहे. सिमेंटचे दर वाढल्याने शासकीय योजनांसह स्वखर्चातून घर बांधणाऱ्या सर्वसामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडल्याने घराचे स्वप्न धुसर बनले आहे.
सिमेंटचे दर वाढल्याने साहजिकच बांधकाम व्यावसायिकांनाही दरात वाढ करावी लागली आहे. मात्र, या दरवाढीबद्दल सर्वसामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सिमेंटचे दर वाढल्याने बांधकामाचा खर्चही वाढला आहे. अचानक ही दरवाढीमुळे बांधकाम करणाऱ्यांचे बजेटच कोलमटले आहे. एकदम एका पोत्यामागे 40 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यात बांधकामसाठी वाळू मिळत नाही. ती मिळविण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे कच्चचा वापर बांधकाम व्यवसायिकांकडून केला जात आहे. त्यात आता गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सिमेंटचे दर वाढल्याने बांधकाम करणे अवघड झाले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सिमेंटचे दर वाढले आहे. कंपन्यांकडून याबाबत कारण स्पष्ट केले नाही. तरी कोळसा व वाहतूक खर्च वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
संतोष होळकर, विक्रेता, केडगाव