पारनेर – अहमदनगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा येथे काल (रविवार) सायंकाळी शिवाजी ठाणगे नावाचे माजी सैनिक रस्ता ओलांडत असताना कंटेनरने त्यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी शिवाजी दत्तू ठाणगे (वय ४२) त्यांच्या स्कूटी गाडीवरून (एमएच १६ बीएक्स ९३४२) हाॅटेल संदीपजवळ रस्ता ओलांडत असताना पुण्याहून नगरच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरने (एमएच १२ आरएन ६५७९) त्यांना जोराची धडक दिल्याने ठाणगे स्कूटीसह कंटेनरच्या चाकाखाली सापडले व जागीच ठार झाले.
घटनेची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक पवार, सुपा पोलीस स्टेशनचे चालक शिंदे, वाहतूक पोलीस शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त ठाणगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. कंटेनरचालकाविरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.