नगर -राज्य शासनाकडून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधा पत्रिकाधारकांना दिवाळी सणासाठी 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. पूर्वीच्या आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल अशा 4 वस्तू होत्या. या वर्षी मैदा आणि पोहे या दोन वस्तूंचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 7 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या 40 टक्के वाटप पूर्ण झाले असून उर्वरित वाटप करण्यासाठी पुरवठा विभागाने कंबर कसली आहे. दिवाळीपूर्वीच शिधाचे वाटपाचे उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवले असून तसे नियोजन करण्यात आले आहे.
वर्षापासून दिवाळीत आनंदाचा शिधा दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्डधारकांना दिला जातो. आता दिवाळीचा शिधा देण्याचे नियोजन सुरू आहे. गणेशोत्सवात 100 रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल या किटमध्ये देण्यात आले होते. आता दिवाळीच्या शिधामध्ये मैदा व पोहे या दोन वस्तू वाढविण्यात आल्या आहेत. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दारिद्र्यरेषेवरील तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळेल.
जिल्ह्यातील 80 हजार अंत्योदय लाभार्थी, तसेच 6 लाख प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा सुमारे पावणेसात लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पुरवठा दाराकडून तालुकास्तरावर पुरवठा झाल्यानंतर त्याचे किट करून ते लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सुमारे पावणेसात लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात शिधा जनतेपर्यंत वेळेवर पोहोचला नाही. किटमध्ये काही वस्तू कमी आल्या, अशा तक्रारी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची चौकशी करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत.
100 रुपयांत मिळणार सहा वस्तू
जिल्ह्यातील पावणेसात लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा या किटमध्ये 1 किलो साखर, 1 किलो खाद्यतेल, तसेच रवा, चणाडाळ, पोहे व मैदा या चार वस्तू प्रत्येकी अर्धा किलो देण्यात येणार आहेत. अशा 6 वस्तूंची किट 100 रुपयांत मिळणार आहे.