मनसेचे आंदोलन स्थगित
पारनेर- नगर-पुणे महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेऊन जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन इशारा दिल्यानंतर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्ग यांना दिलेल्या इशाऱ्याने चेतक एंटरप्रायजेस म्हसणे फाटा टोलनाका व्यवस्थापनाने चालू असलेल्या कामाचे स्वरूप तसेच दिपावली निमित्ताने महामार्गावर असलेल्या गर्दीमुळे आलेल्या सर्व अडचणी संदर्भात आपली व्यथा मांडली. प्रत्यक्षात कार्यवाही सुरू केल्याने मनसेचे आंदोलन स्थगित केले आहे.
मनसे नेते अविनाश पवार यांनी महामार्गावर अपघात होऊन रक्त सांडले जाते. त्यामुळे ठोस भूमिका सांगा, कामे दाखवा असे आक्रमकपणे सांगितले. बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी यांना चालू असलेल्या कामाचे फोटो व्हिडिओच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्षात काम चालू असल्याचे व अतिक्रमण संदर्भात कारवाई प्रक्रिया निदर्शनास आणून दिली. त्यामुळे महामार्गावरील सुविधा पूर्णपणे उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला वेळ देत सहकार्य करावे. सर्व कामे पूर्णपणे मार्गी लावणार असल्याचा विश्वास देऊन सर्वसामान्य प्रवासी वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच चेतक एंटरप्रायजेस व्यवस्थापन आणि सुपा पोलीस प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी मनसे सहकार सेना जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के, वाहतूक सेनेचे बंडू बनकर, उप तालुकाध्यक्ष रविश रासकर, अक्षय सुर्यवंशी, शेलार यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.