पिंपरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या युवासेनेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरदेसाइ यांच्या विनंतीनुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिंदे गटातील अनेक नेत्यांच्या पुत्रांचा समावेश असून, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र व पुणे, मावळ लोकसभा अध्यक्ष विश्वजीत बारणे यांना राज्य कार्यकरिणीत बढती मिळाली आहे. त्यांच्यावर युवासेनेची पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवपदची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या सोबतीला पश्चिम महाराष्ट्रात ऋतुराज क्षाीरसागर हे देखील असणार आहेत.
युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नव्या राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दीपेश म्हात्रे व किरण साळी यांची राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून, ते मध्यवर्ती कार्यालय सांभाळतील. याशिवाय विभागीय सचिवपदी दहा पदाधिकार्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये विकास गोगावले व रुपेश पाटील यांच्याकडे कोकण, राहुल लोंढेंकडे ठाणे व पालघर तर अविष्कार भुसेंवर उत्तर महाराष्ट्राची धुरा सोपविण्यात आली आहे. तर अभिमन्यू खोतकर व नीलेश शिंदे हे मराठवाड्याची जबाबदारी सांभाळतील. पूर्व विदर्भाकरिता शुभम नवले तर पश्चिम विदर्भासाठी विठ्ठल सरप पाटील यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, राज्य समन्वयकपदी एकूण तीन पदाधिकार्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये नितीन लांडगे हे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व ठाण्यातील पदाधिकार्यांशी समन्वय ठेवतील. कोकण, मुंबई व पालघरसाठी अॅड. विराज महामुणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विराज निकम हे विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकार्यांशी समन्वय साधतील.
युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सरचिटणीस राहुल कलाल व अभय घोले यांच्या स्वाक्षरीने ही राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.