गणेश आंग्रे
पुणे – राज्य नोंदणी व मुद्रांक विभागाने दस्तांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी सुरू केलेल्या “आय-सरिता’ या संगणक प्रणालीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. देशपातळीवर एकच संगणक प्रणाली असावी, यासाठी सर्व राज्यात “आय-सरिता’ प्रणालीच्या धर्तीवर राष्ट्रीय जेनेरिक दस्ताऐवज नोंदणी प्रणाली (एनजीडीआरएस) या नावाने दस्तनोंदणी प्रणाली सादर केली आहे. त्यानुसार देशातील सुमारे 17 राज्यांमध्ये ही संगणक प्रणाली राबवली जात आहे.
दस्त नोंदणीतील गतिमानता यावी आणि ती अधिक पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी राज्य सरकारकडून “आय-सरिता’ ही प्रणाली लागू करण्यात आली होती. देशात प्रथमच महाराष्ट्रात ही प्रणाली सुरू करण्यात आली. स्टॅम्प रजिस्ट्रेशन ऍक्ट हा सर्व राज्यांमध्ये जवळपास सारखाच आहे. त्यामुळे दस्तांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी एकच संगणक प्रणाली असावी, यासाठी केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी देशातील सर्व राज्यातील नोंदणी महानिरीक्षकांची एकत्रित बैठक घेतली होती.
या बैठकीत प्रत्येक राज्यातील पद्धतीचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील “आय सरिता’ प्रणालीची माहिती घेतली. त्यामध्ये काही सुधारणा करून देशभरात ही प्रणाली राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी एका समितीची स्थापन करण्यात आली होती. सध्याच्या प्रणालीमध्ये अनेक बदल करून ती अधिक गतिमान करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्य नोंदणी व मुद्रांक विभागाने 2002 पासून दस्त नोंदणीसाठी संगणक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. त्यानंतर 2012 पासून संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणाली मध्यवर्ती पद्धतीने “आय-सरिता’ प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. तसेच ई-पेमेंट व ई-सर्च यासारख्या विविध “ई’ उपक्रमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या या संगणक प्रणालीला देशपातळीवर गौरविण्यात आले आहे. यानंतर आता अन्य राज्यांत ही प्रणाली वापरली जाणार आहे.
या राज्यांत प्रणाली
ही प्रणाली पंजाब, गोवा, मणिपूर, मिझोराम, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, त्रिपुरा, बिहार, आसाम, मेघालय, उत्तराखंडसह 17 राज्यांत वापरण्यात येत आहे.
“आय-सरिता’ प्रणालीमुळे होणारे फायदे
- नागरिकांना दस्त नोंदणी व शुल्क ऑनलाइनद्वारे करणे शक्य.
- ई-सर्चमुळे मिळकतींची सर्व माहिती एका क्लिकवर
- राज्याच्या सर्व डाटा एकाच ठिकाणी.
- दस्त नोंदणी गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने
“आय-सरिता’ म्हणजे काय?
“आय-सरिता’ अर्थात “स्टॅंप अँड रजिस्ट्रेशन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड अँडमिनिस्ट्रेशन’ ही मध्यवर्ती सर्व्हरवर आधारीत एकात्मिक प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये नोंदणी झाल्याबरोबर तात्काळ इंडेक्स व दस्ताची प्रत ई-सर्चमध्ये उपलब्ध, दस्ताची लिंक पक्षकारांना एसएमएस व ई-मेलद्वारे देण्यात येते. सातबाराचा संबंध असल्यास, हा डेटा भूमि अभिलेख विभागाकडे पाठविला जातो.
अनेक भाषांचे पर्याय
दस्त नोंदणी झाल्यानंतर “इंडेक्स-टू’ हा मराठी अथवा इंग्रजी भाषेमध्ये तयार होतो. त्यामध्ये आता अनेक भाषेचे पर्याय देण्यात आले आहेत. ही प्रणाली तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.