नगर -जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. 5) मतदान होणार आहे. सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी माघारीनंतर प्रत्यक्षात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. सरपंच पदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर 610 उमेदवार रिंगणात आहे. 1 हजार 93 मतदान केंद्र राहणार असून साडे चार हजार अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत.
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पद तर काही ठिकाणी सरपंच पदाची जागा बिनविरोध झाल्या आहेत. जाहीर प्रचाराची सांगता शुक्रवारी (दि.3) झाली. उमदेवारांची संख्या पुढील प्रमाणे (कंसात बिनविरोध झालेल्या उमेदवारांची संख्या)- कोपरगाव 17 ग्रामपंचायत 405 (19) सदस्य आणि 48 (1) सरपंच, कर्जत 6 ग्रामपंचायत 111 (6) सदस्य आणि 18 (1) सरपंच, नगर 8 ग्रामपंचायत 180 (18) सदस्य आणि 19 (2) सरपंच, राहुरी 22 ग्रामपंचायत 528 (26) सदस्य आणि 68 (1) सरपंच, राहाता 12 ग्रामपंचायत 374 (10) सदस्य आणि 51 सरपंच, पारनेर 7 ग्रामपंचायत 144 (6) सदस्य आणि 22 (1) सरपंच, नेवासा 16 ग्रामपंचायत 262 (43) सदस्य आणि 50 सरपंच, पाथर्डी 15 ग्रामपंचाय 253 (7) सदस्य आणि 41 (1) सरंपच, श्रीगोंदा 10 ग्रामपंचायत 275 (7) सदस्य आणि 37 (1) सरपंच, जामखेड 3 ग्रामपंचायत 59 (1) सदस्य आणि 10 सरपंच, अकोला 27 ग्रामपंचायत 361 (114) सदस्य आणि 119 (6) सरपंच, संगमनेर 7 ग्रामपंचायत 132 (18) सदस्य आणि 13 (2) सरपंच, श्रीरामपूर 17 ग्रामपंचायत 338 (41) सदस्य आणि 36 (4) सरपंच, जामखेड 3 ग्रामपंचायत 59 (1) सदस्य आणि 10 सरपंच रिंगणात आहेत.
13 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक
जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. 8 हजार 926 मतदार असून एक सरपंचपदासह 12 सदस्यांची निवड करणार आहेत. अकोले 4, कर्जत 2 तर संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर, नेवासे, शेवगाव, श्रीगोंदे प्रत्येकी एका ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. राहाता तालुक्यात एका ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी 3 मतदान केंद्र राहणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी एकूण 16 मतदान केंद्र राहणार आहेत.
1 हजार 500 पोलिसांचा बंदोबस्त
पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली 6 उपअधीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाचे 91 अधिकारी बंदोबस्तात असतील. समवेत 982 पुरुष व 178 महिला अंमलदार पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला 175 होमगार्ड असतील. तसेच 1 आरसीपी प्लाटून, 1 क्यूआरटी प्लाटून, 1 एसआरपीएफ प्लाटून बंदोस्तात राहणार आहे.