अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांनी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा होणार आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही आज चौंडीत होणार होता मात्र चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवलं आहे. यानंतर क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी पवार घराण्यावरून जहरी टीका केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले,’अहिल्यादेवी होळकर ह्यांचं जन्मस्थळ ही कुणाच्या बापाची जहागीर नाही. . आम्ही प्रवेश करणारच ! हे समाज कंटक राजकारणी आम्हाला का अडवत आहेत हे जनतेला ठाऊक आहे. ते पुढे ट्विटमध्ये लिहितात,’चौंडी ही पवारांचा बापाची जहागिरी नाही.’ असे म्हणत खोत यांनी पवार घराण्यावर टीका केली आहे.