दलालांची मक्‍तेदारी मोडीत, कृषी सुधारणा कायदा शेतकऱ्यांसाठी लाभदायक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

लखनौ  – केंद्र सरकारने अलीकडेच ज्या कृषी विषयक सुधारणांचे कायदे मंजुर केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता आपला माल थेट बाजारात नेऊन विकण्याची मूभा मिळाली आहे. त्यामुळे या सिस्टीममधील दलालांची मक्‍तेदारी मोडीत निघाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे असे मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज त्यांच्या वाराणसी मतदार संघांतील अनेक प्रकल्पांचा प्रारंभ झाला. त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिग द्वारे ते उपस्थितांना संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.

ते म्हणाले की, सरकारच्या स्वामित्व योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचे कार्ड मिळणार आहे. त्याद्वारे त्यांना बॅंकांमधून कर्ज घेणे सोपे होणार आहे. त्यांची मालमत्ता अन्य कोणा व्यक्‍तीकडून बळकावली जाण्याची शक्‍यताही कमी होणार आहे.

गेल्याल काहीं वर्षात वाराणसीचा सर्वांगीण विकास झाला असून त्यामुळे या शहराला नवी ओळख मिळाली आहे असा दावाही मोदींनी यावेळी केला. वाराणसीतील नागरिकांनी करोना विषाणुच्या विरोधात सामाजिक ऐक्‍य दाखवून जो लढा दिला त्याबद्दलही मोदींनी त्यांची प्रशंसा केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.