कापूरहोळ -भोर तालुक्यातील मौजे न्हावी येथे सबस्टेशन उभारण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून दिली आहे. ही जागा महावितरणने खरेदी करून आठ दिवसांत ताब्यात न घेतल्यास महावितरणच्या प्रकाश भवन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी भोर तालुक्यातील महावितरणच्या माध्यमातून करावयाच्या कामांची मागणी शिवतरे यांनी केली.
यावेळी शिरगाव म्हसर बुद्रुक, म्हसर खुर्द, जयतपाड, निगुडघर, करंजगाव, नाझरे, डेहेन कोंडगाव, डेहराडून जव्हेरी,
शिळींब आदी गावांना पाणीपुरवठा योजनांसाठी तातडीने वीज कनेक्शन देण्याची मागणी करण्यात आली. कर्नवडी, वेनवडी, पिसावरे, न्हावी, टापरेवाडी, कासुर्डी, आळंदे, मळे गावठाण, इंगवली गावठाण , शिंद, उत्रोली, वडगाव डाळ आदी गावांना ऍडिशनल ट्रासफॉर्मरची गरज असल्याने ते बसवावे. मौजे भोंगवली, पेंजळवाडी, वडगाव डाळ, कोंढरी येथील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्यात यावे.
मागील तीन वर्षांमध्ये गावनिहाय साडेचारशे पोल बदलायचे होते. पैकी तीनशे पोल बदलले असून उर्वरित दीडशे पोल व गंजलेले पंचेचाळीस बॉक्स बदलण्यात यावेत. भाटघर धरणाखालील महावितरणचे सब स्टेशन नादुरुस्त असुन ते तातडीने दुरुस्त करण्याबाबत राज्य शासनाकडून प्रस्ताव मंजूर करून घ्यावा,
वेळू येथील सबस्टेशन उभारणीसंदर्भात प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे विहित नमुन्यामध्ये पाठवून त्यास प्रशासकीय मान्यता घ्यावी, आदी मागण्या महावितरणकडे शिवतरे यांनी केली.
भोंगवली येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून शेतकऱ्याचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी शिवतरे यांनी केली.
त्यास सकारात्मक प्रतिसाद देत इंजिनीयर पावडे यांनी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांना शेतीसाठी 24 तास वीज उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली. यावेळी 90 टक्क्यांपेक्षा जास्त वसुली असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरवर जाना वीज उपलब्ध करून देण्यास महावितरणने मान्यता दिली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, संचालक लोळे, चीफ इंजिनियर पावडे, अधीक्षक अभियंता पाटील, आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, प्रवीण शिंदे, धनंजय जगताप, मंदार वीर उपस्थित होते.