सातारा – साताऱ्यात सेव्हन स्टार इमारतीमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने शहरात खळबळ उडाली… सातारा पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकासह घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिसर निर्मनुष्य केला.. बॉम्बची माहिती समजताच बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली… गर्दीला बाजूला करत अडगळीच्या ठिकाणी ठेवलेली बॉम्बसदृश वस्तू पोलिसांनी शिताफीने बाजूला केली… या प्रसंगाने नागरिकांचे श्वास रोखले गेले. मात्र, हे पोलीसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार कायदा सुव्यवस्था सांभाळणे व पोलीस यंत्रणेची सतर्कता याचा सराव म्हणून शुक्रवारी सकाळी अत्यंत गोपनीय नियोजनबद्ध सराव घेण्यात आला. यावेळी बॉम्ब शोधक, नाशक पथक व दहशतवाद विरोधी पथक अशा 50 हून अधिक जवानांनी या सरावात भाग घेतला. सेव्हन स्टार इमारतीच्या समोरील वर्दळीच्या रस्त्यावर पोलीस वाहनांची गर्दी आणि जवानांची धावपळ यामुळे ये जा करणारे नागरिक धास्तावले होते.
बॉम्ब शोधक पथकाने वैशिष्टयपूर्ण तंत्राने एका बॅगमधील बॉम्ब सदृश्य वस्तू शोधून ती निकामी केली. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणेला सराव म्हणून सातारा बसस्थानकानजीक असलेल्या सेव्हन स्टार इमारतीत मॉक ड्रिल घेण्यात आले. हे प्रात्यक्षिक असल्याचे पोलिसांनी सांगताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.