हिंजवडी – हिंजवडीतील ट्रॅफिकमुळे येथील आयटी कंपन्या स्थलांतरित होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात मांडली असता त्याचे काहीसे पडसाद हिंजवडीत पाहायला मिळाले. हिंजवडी पोलिसांनी पेट्रोलिंगच्या दरम्यान हिंजवडी गावठाणात मुख्य रस्त्यांवरील काही अतिक्रमाणांवर दंडात्मक कारवाई केल्याचा केवळ फार्स केला.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या व दुकानाच्या पाट्या हटविल्या. तर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या काही पथारीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या या अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईमुळे पथारीवाले संभ्रमात पडले. पोलिसांनी अचानक कारवाई का केली याचे कोडे अनेकांना उलगडले नाही. मात्र, हिंजवडीत एमआयडीसी, ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत, ही अतिक्रमणे कोण व केव्हा हटविणार याचे कोडं अद्याप सुटलेले नाही.
पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना संध्याकाळच्या वेळेत पायी पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रहदारीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
– विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.