सचिन सुंबे
सोरतापवाडी -नुकत्याच झालेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनसेवा पॅनलचा दारुण पराभव झाला. वास्तविक पाहता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्ष नसतो; परंतु यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला तरी जनसेवा पॅनलचा फक्त एक उमेदवार निवडून आला. पूर्व हवेलीत राष्ट्रवादीला अनेक पराभवाचे धक्के बसत आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अशोक पवार यांना सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पूर्व हवेलीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना घेऊन मोट बांधावी लागणार आहे.
यापूर्वीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीची एकी नसल्यामुळे अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामध्ये पीएमआरडीए निवडणूक, पुणे जिल्हा बॅंक निवडणूक व आता ग्रामपंचायत निवडणुकीचा समावेश आहे. हा पराभव राष्ट्रवादी कॉंग्रेसला जसा जिव्हारी लागला. तसाच पराभव का झाला याचे चिंतन करणे राष्ट्रवादीला गरजेचे आहे. पीएमआरडीएच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पूर्ण वर्चस्व असताना केवळ सरपंच विठ्ठल शितोळे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत करून विठ्ठल शितोळे यांचा 11 मतांनी पराभव केला.
विठ्ठल शितोळे हे कोरेगाव मूळच्या सरपंच पदावर विराजमान होताच त्यांनी खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव मूळ या गावासाठी विविध विकास कामे मंजूर करून आणली. माणूस मोठा होताना दिसत असला की त्याचे पाय ओढायची पद्धत विठ्ठल शितोळे यांच्या बाबतीत घडली.
राष्ट्रवादीचे पूर्ण वर्चस्व असताना सुद्धा भाजपचे उमेदवार स्वप्नील उंद्रे निवडून आले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश घुले यांना भाजपचे प्रदीप कंद यांच्याकडून 14 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रदीप कंद यांना राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी पूर्णपणे पाठिंबा देत निवडून आणल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
प्रकाश मस्के व विकास दांगट हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असल्याने त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यात पूर्व हवेलीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांनी विकास दांगट यांचा प्रचार करून प्रकाश मस्के यांचा पराभव झाला. प्रकाश मस्के यांनी पूर्व हवेलीचे मातब्बर नेते कै. अशोक भाऊ काळभोर यांचा पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पराभव केला होता. प्रकाश म्हस्के यांनी पूर्व हवेलीत अजिबात लक्ष दिले नव्हते; अशोकभाऊंच्या पराभवाचे शल्य भरून काढण्यासाठी तसेच नातेसंबंधामुळे विकास दांगट यांच्या बाजूने सर्वजण एक झाल्यामुळे ते निवडून आले.
…म्हणून भाजपचा उमेदवार निवडून येतो
येणाऱ्या पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये असे झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फार मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपने वरील निवडणुकीत विजय मिळविला असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन उमेदवार कुठे कमी पडतो की, फक्त पाडापाडीमुळे उमेदवाराचा पराभव होतो,
याची दखल घेणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर हवेली तालुक्यात आमदार अशोक पवार यांना सर्वांना बरोबर घेऊन मोट बांधावी लागणार आहे. याउलट भाजपने कुठलाही उमेदवार दिला तरी त्यांची एकी, प्रचारासाठी वापरलेली यंत्रणा व वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार काम होते.