भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर 370 वे कलम रद्द – अमित शहा

कोलकता – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी पश्‍चिम बंगालमधील सभांमध्ये घटनेचे 370 वे कलम आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तक (एनआरसी) हे वादग्रस्त मुद्दे उपस्थित केले. केंद्रात भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केले जाईल. तसेच, देशभरासाठी एनआरसी आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पश्‍चिम बंगालच्या दार्जिलिंग आणि रायगंज लोकसभा मतदारसंघांमध्ये शहांच्या सभा झाल्या. त्यावेळी त्यांनी बांगलादेशी घुसखोरांचा उल्लेख वाळवी म्हणून केला. प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर हुसकावून लावण्यासाठी देशभरात एनआरसी लागू करण्यास भाजप वचनबद्ध आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रमाणे घुसखोरांकडे आम्ही मतपेढी म्हणून पाहत नाही. मित्रपक्ष नॅशनल कॉन्फरन्सप्रमाणे ममतांनाही जम्मू-काश्‍मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान हवा आहे का ते त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. विरोधकांची महाआघाडी स्थापन करण्यासाठी ममतांनी घेतलेल्या पुढाकाराची शहा यांनी यावेळी खिल्ली उडवली. कॉंग्रेस आणि माकप हे ममतांचे मित्र असतील तर ते पक्ष तृणमूल कॉंग्रेसवर टीका का करतात, असा उपहासात्मक सवाल त्यांनी विचारला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.