सुदानमधील सैन्याने सरकार उलथवले

खारतुम – सुदानमधील सैन्याने अध्यक्ष ओमर अल बशीर यांच्याविरोधात बंड करून सरकार उलथवून टाकले आहे. गेल्या तीन दशकांपासून सत्तेवर असलेल्या बशीर यांच्याविरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन सुरू झाले होते. सरकार उलथवण्यात आले असून अध्यक्ष बशीर यांना ताब्यात घेण्यात अले आहे, असे संरक्षण मंत्री अवाद इब्नोफ यांनी टिव्हीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.

बशीर यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर आता लष्करी शासनाला सुरुवात होईल आणि ही लष्करी राजवट पुढील दोन वर्षांपर्यंत कायम राहिल, असेही इब्नोफ यांनी म्हटले आहे. देशाच्या सीमा अणि हवाई हद्दी पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बशीर यांनी 1989 साली उठाव करून देशाची सत्ता हस्तगत केली होती. आफ्रिकेतील सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवलेले बशीर यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये वंशिक हत्याकांड आणि युद्धगुन्ह्यांचे आरोप आहेत.
आज काही महत्वाची घोषणा केली जाईल, असे आश्‍वासन सैन्याच्यवतीने जनतेला दिले गेले होते. त्यानुसार सकाळी सुदानी नागरिकांच्या प्रचंड झुंडीखारतुमच्या दिशेने चालून गेल्या. या जमावाने लष्करी मुख्यालयबहेरच्या मोकळ्या मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले. तेथे गेल्या सहा दिवसांपासून असे आंदोलन सुरूच होते. बशीर यांच्याविरोधात डिसेंबर महिन्यापासूनच आंदोलन चिघळले होते.

सैन्याने बशीर यांच्या नॅशनल कॉंग्रेस पार्टीशी संबंधित इस्लामिक मुव्हमेंटच्या कार्यालयांवर छापे घातले. सैन्याने टिव्हीवरील बातम्या थांबवल्या आणि लष्करी संगीत ऐकवले गेले. सरकारी कार्यालयांवरही जमावाने हल्ला केला आणि वाहनांची तोडफोड केली. सरकार उलथवल्याची घोषणा झाल्यावर नागरिकांनी देशभर जल्लोष केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.