बैरुत स्फोटानंतर भारतातील ‘या’ शहरात ७०० टन अमोनियम नायट्रेट पडून असल्याचे उघड

चेन्नई – दोन दिवसांपूर्वी लेबनानची राजधानी बैरुत येथे असुरक्षितपणे साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की यामध्ये किमान १३५ लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. मात्र बैरुत येथे झालेल्या या स्फोटानंतर चैन्नईतील कस्टम विभागाकडे जप्त करण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटचा मोठा साठा असल्याचे वृत्त समोर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

एका नामांकित वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे कस्टम विभागाच्या ताब्यात ७०० टन अमोनियम नायट्रेट गेल्या काही वर्षांपासून पडले आहे. हे अमोनियम नायट्रेट २०१५ मध्ये जप्त करण्यात आल्याचीही माहिती आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘फटाके व खते निर्मितीसाठी वापरण्यात येणारे अमोनियम नायट्रेट देशातील फटाक्यांची राजधानी समजल्या जाणाऱ्या सिवाकासी येथील व्यापाऱ्याने मागवले होते. मात्र २०१५ मध्ये कस्टम विभागाकडून जप्ती करण्यात आल्यापासून हा साठा चैन्नई बंदरावरच पडून आहे.’

मात्र चैन्नई बंदरावरील एका अधिकाऱ्याने जप्त करण्यात आलेले अमोनियम नायट्रेट आता बंदरावर नसून ते कस्टम विभागाच्या ताब्यात असल्याचा दावा केला. ते म्हणतात, “प्रत्येकी 20 टन अमोनियम नायट्रेट असलेले, सुमारे ३६ कंटेनर,फार पूर्वी हलविण्यात आले होते आणि आता ते कस्टम विभागाच्या अखत्यारीत आहेत,”

कस्टम विभागामध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जप्त करण्यात आलेले अमोनियम नायट्रेट विभागाच्या ताब्यात असल्याचे मान्य केले. ते म्हणतात, “श्री अम्मन केमिकल्सद्वारे बेकायदेशीररीत्या मागवण्यात आलेले ६९७ टन अमोनियम नायट्रेट आमच्या सत्व कंटेनर डेपोमध्ये ठेवण्यात आले आहे. आम्ही त्याची विल्हेवाट लावण्याचे काम करीत आहोत, आणि लवकरच सर्व तपशील देऊ”

मात्र या अधिकाऱ्याने, ‘हे प्रकरण न्यायालयासमोर असल्याने  अमोनियम नायट्रेटची विल्हेवाट लावण्यात कस्टम विभागाकडून दिरंगाई करण्यात आली असं म्हणता येणार नाही.’ असं स्पष्टीकरण दिलं.     

Leave A Reply

Your email address will not be published.