पुसेगाव : पुसेगाव, वडूज व औंध पोलिस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यातील व मोक्का कायद्याअंक्तर्गत दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपीला पुसेगाव पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केले.
याबाबत पुसेगाव पोलिसांनी सांगितले, संकेत आलेशा काळे ( वय 19, रा. सिध्देश्वर कुरोली ता. खटाव) याच्यावर पुसेगाव, वडूज व औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गुन्हे दाखल आहेत.
मोक्का कायद्याअंतर्गतही त्याच्यावर गुन्ह्याची नोंद आहे. संकेत काळे फरारी असल्याने पोलिस त्याच्या मागावर होते. दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या सूचनेनुसार पुसेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोलिस नाईक सचिन माने, पोलिस हवालदार सचिन जगताप, इम्तियाज मुल्ला, ज्ञानेश्वर यादव यांनी भुरकवडी- सिध्देश्वर कुरोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून तेथे आलेल्या संकेतचा पाठलाग करुन अटक केली. या मोक्काअंतर्गत गुन्ह्याचा तपास महामुनी करत आहेत.