पुणे(प्रतिनिधी) – आंदेकर टोळीनंतर आता नाना पेठ, गणेश पेठ या मध्यवस्तीतील व्यापारी पेठेत दहशत माजविणाऱ्या सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने गुंड सुरजसह आठ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. शहरातील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी “मोक्का’कायद्याचा वापर करण्यास सुरू केला आहे. गेल्या दोन महिन्यात शहरातील अकरा गुंड टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत दहशत असलेल्या गुंड बंडू आंदेकर याच्यासह साथीदारांविरोधात पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. सूरज ठोंबरे, त्याचा साथीदार सोमनाथ गायकवाड पूर्वी आंदेकर टोळीत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे आंदेकर टोळीबरोबर वाद सुरू झाले होते. वर्चस्वाच्या वादातून त्यांनी नाना पेठ, गणेश पेठ भागात दहशत करून एकमेकांच्या साथीदारांवर हल्ले सुरू केले.
दोन महिन्यांपूर्वी ठोंबरे टोळीतील गुंडांनी नाना पेठेत दहशत करून एकाचा खुनाचा प्रयत्न केला होता. आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई केल्यानंतर पोलीस आयुक्त गुप्ता यांनी प्रतिस्पर्धी ठोंबरे टोळीवर कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार कानिफनाथ विनोद महापुरे, ओंकार गजानन कुडले , राजन मंगेश काळभोर, शुभम दिपक पवळे, आकाश मंगेश सासवडे, सूरज अशोक ठोंबरे, सोमनाथ सयाजी गायकवाड, नरसिंग भीमा माने यांच्याविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली. पवळे, सासवडे, माने, ठोंबरे आणि गायकवाड यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी ही कारवाई केली.