- चिंचवड येथील घटना : पोलीस चौकीत हजर होत दिली खुनाची कबुली
पिंपरी – दारू पिताना झालेल्या भांडणात त्यांनी मित्राच्या डोक्यात “वॉश बेसिन’ टाकून त्याचा खून केला. त्यानंतर तीनही आरोपी जवळच्या पोलीस चौकीत हजर झाले. त्यांनीच पोलिसांना आपण खून केल्याची माहिती दिली. ही घटना चिंचवड येथे रविवारी (दि. 30) रात्री घडली.
शुभम रणजित साठे (वय 21, रा. एकता हौसिंग सोसायटी, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खूनप्रकरणी कृष्णा कापुरे (वय 19), अजय क्षीरसागर (वय 20) आणि ज्ञानेश्वर थोरात (वय 20, तिघेही रा. समता कॉलनी, थेरगाव) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
चिंचवड पोलीस ठाण्यातील निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपी ऑनलाइन खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपनीत काम करतात. लॉकडाऊनमुळे काम नसल्याने सध्या ते घरीच होते.
रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास चिंचवड-काळेवाडी रस्त्यावरील चितराव गणपती मंदिराजवळ असलेल्या खुशबू हॉटेलमागे ते दारू पिण्यासाठी चौघेजण बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी चिडलेल्या आरोपींनी बाजूला पडलेले “वॉश बेसिन’ शुभम याच्या डोक्यात घातले. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
त्यानंतर आरोपी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेवाडी पोलीस चौकीत स्वतःहून हजर झाले. त्यांनी घडलेली हकीगत पोलिसांना सांगितली. त्यानंतर काळेवाडी चौकीतील पोलिसांनी त्यांना चिंचवड पोलिसांच्या हवाली केले. सध्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे चिंचवड पोलिसांनी सांगितले.