नवी दिल्ली – जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये 88.17 मीटर भालाफेक करुन सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर ‘नीरज चोप्रा’ याची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. मागील सात वर्षांमध्ये नीरज चोप्रा याने सात सुवर्णपदकावर नाव कोरलेय.
नीरज चोप्रा सध्या भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूमध्ये गणला जातो. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी देखील नीरजच्या कामगिरीचे कौतुक केले. सुनिल गावसकर यांनी नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. यावेळी गावसकर म्हणाले की, ‘खूप आनंद झाला. भारताचे इतर खेळ देखील चांगली कामगिरी करत आहेत.
नीरजला आपण यापूर्वीही पाहिलं आहे. त्याने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. नीरजने यावेळी सुवर्ण पदक जिंकणे गरजेचे होते. आज त्याने सुवर्ण पदक पटकावले आहे. यामुळे इतर खेळाडूंना देखील प्रेरणा मिळते.’ असं यावेळी सुनील गावसकर म्हणाले.
सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर नीरज चोप्रा काय म्हणाला….
मी विचार करत होतो की, पात्रता फेरीनंतर मला स्वतःला अधिक पुश करावे लागेल. चांगले थ्रो करण्यापूर्वी किती दबाव असू शकतो, याची तुम्ही कल्पना करु शकत नाही.
आम्हाला पात्रता फेरीतही तंत्रात किंवा वेगात किंवा थ्रोमध्ये काहीतरी अधिक पुश करावे लागले होते. पात्रता फेरीच्या दिवशी थ्रो देखील खूप चांगले होते आणि मधल्या काळात रिकव्हरी वेळ एक दिवस होता.
मग फायनलमध्ये अशीच कामगिरी करायचे दडपण असते. पण मला नेहमी वाटतं की, मी नेहमीच सर्वोत्कृष्ट थ्रो करू शकेन. ऑलिम्पिक पदकही खूप सुंदर आहे आणि आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमधले हे विजेतेपद खूप मोठे आहे.
जर तुम्ही स्पर्धेच्या दृष्टीने तुलना कराल, तर ऑलिम्पिकपेक्षा जागतिक अजिंक्यपद नेहमीच खूप कठीण असते. माझ्यावर प्रेम करत असलेल्या सर्व भारतवासीयांचे आभार.