भारतीय गोल्डन बॉय अर्थात नीरज चोप्राने पुन्हा इतिहास रचला आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरजने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील नॅशनल अॅथलेटिक्स सेंटरमध्ये 88.17 मीटर भाला फेकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या या सुवर्ण कामगिरीचे जगभरातून कौतुक केले जात आहे. या सामन्यादरम्यान नीरजला कडवी टक्कर देताना, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी, झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने 86.67 मीटरची सर्वोत्तम थ्रो करून कांस्यपदकावर निशाणा साधला. नीरजसोबत डीपी मनू आणि किशोर जेना हे दोन भारतीय खेळाडू अंतिम फेरीत होते.