- उद्योगनगरीवर लॉकडाऊनचे सावट
- तब्बल 834 नव्या रुग्णांची नोंद
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाचा संसर्ग सुरू होऊन एक वर्ष उलटले आहे. एक वर्षानंतरही उद्योगनगरीवर करोनाचे सावट आहे. आज पाच महिन्यांनंतर करोना रुग्णांनी पुन्हा आठशेचा आकडा पार केला. गेल्या 24 तासांमध्ये 834 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना शहरावर पुन्हा लॉकडाऊनचे सावट आले आहे.
शहरामध्ये आजपर्यंत 1 लाख 11 हजार 515 जणांना करोनाची लागण झाली आहे. शहरामध्ये जून ते सप्टेंबर 2020 या कालावधीत रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक होता. या कालावधीत तब्बल 77 हजार 976 बाधितांची नोंद झाली होती. या वेळी दररोज सरासरी 900 ते 1000 रुग्णांची नोंद होत होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये करोनावाढीचा वेग काहीसा मंदावला. आता पुन्हा करोनाने उसळी घेत आज पाच महिन्यांनंतर नवा उच्चांक गाठला आहे. आज तब्बल 834 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी एवढे बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर शहरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 812 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहराबाहेरील 22 रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 5 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 3 तर शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील निगडी प्राधिकरण, पिंपरी, भोसरी येथील तिघांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील हिंजवडी व पुणे येथील दोघांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 373 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 890 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3839 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप 1332 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यःस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 1281 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 4478 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 5759 इतकी आहे.
कन्टेन्मेंट झोन वाढले
शहरातील ज्या भागांमध्ये रुग्ण आढळतील त्या भागातील संबंधित परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला जात आहे. शहरामध्ये सद्यःस्थितीत 120 मेजर कन्टेन्मेंट झोन आहेत. तर तब्बल 633 कन्टेंन्मेंट झोन झाले आहेत. तसेच भोसरी, जिजामाता, तालेरा व यमुनानगर रुग्णालय परिसरातील रुग्णसंख्या प्रत्येकी शंभरच्या पुढे गेली आहे. भोसरी रुग्णालय 146, जिजामाता रुग्णालय 137, तालेरा रुग्णालय 112 व यमुनानगर रुग्णालय परिसरात 113 रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त आकुर्डी रुग्णालय 76, सांगवी 87, थेरगाव 98 व वायसीएम रुग्णालय परिसरात 43 रुग्णांची नोंद झाली आहे.
अकरा दिवसांत 5863 रुग्ण
मार्च महिन्याच्या अकरा दिवसांमध्ये 5833 जणांना करोनाची लागण झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्या कमी असली तरी 4 मार्चपासून सातत्याने रुग्णसंख्या पाचशेहून अधिक येत आहे. 1 मार्च या दिवशी शहरामध्ये 256 बाधितांची नोंद झाली होती. तर 4 मार्चला 502 बाधित आढळले होते. यामध्ये सातत्याने वाढ होत असून, आज तब्बल 834 रुग्ण आढळले आहेत.