- गृह विलगीकरणात असणाऱ्यांना इशारा
- सोसायटीच्या चेअरमनवर जबाबदारी
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाच हजाराहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यापैकी चार हजारांहून अधिक रुग्ण हे रुग्णालयात नसून घरात राहून उपचार घेत आहेत. मात्र यामधील अनेक रुग्ण नियमांना पायदळी तुडवत शहरामध्ये राजरोसजपणे फिरत असल्याचे चित्र आहे. याबाबत दैनिक प्रभातमध्ये सोमवारी (दि. 8) हजारो करोनाबाधित ठरताहेत सुपर स्प्रेडर या मथळ्याखाली सविस्तर वृत्त छापण्यात आले होते. या सविस्तर वृत्ताची पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दखल घेतली आहे. यापुढे घरी राहून उपचार घेणारे रुग्ण जर बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबत संबंधित सोसायटीच्या चेअरमनने जबाबदारी घेत रुग्णांवर लक्ष ठेवायचे आहे. अन्यथा संपूर्ण सोसायटी सील करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला आहे.
मार्च महिन्याच्या दहा दिवसांमध्ये शहरामध्ये तब्बल 5051 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 5323 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र यामध्ये 1299 रुग्ण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. तर सौम्य लक्षणे असणारे तब्ब्ल 4024 करोनाबाधित रुग्ण घरी राहूनच उपचार घेत आहेत. घरी राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, मात्र त्यांच्या संपर्कात आल्यास संसर्ग होण्याची शक्यता आहे. या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे हे रुग्ण राजरोसपणे शहरामध्ये फिरत आहेत. लक्षणे तीव्र नसल्याने हे रुग्ण बाधित असल्याचे सहजासहजी लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनाही करोनाची लागण होत आहे. परिणामी शहरातील रुग्णसंख्या दररोज एक नवा उच्चांक गाठत आहे. यावर दैनिक प्रभातमध्ये सविस्तर वृत्त देण्यात आले होते. सोमवारी (दि. 8) प्रसिद्ध झालेल्या हजारो करोनाबाधित ठरताहेत सुपर स्प्रेडर या वृत्ताची दखल आयुक्त राजेश पाटील यांनी घेतली आहे.
करोनाविषयक आज (गुरुवारी) झालेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी अशा रुग्णांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विकास ठाकणे, अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व झोनल रुग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, सर्व सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
भाजी मार्केट सम-विषम पद्धतीने
भाजी मार्केट मध्ये समविषम पध्दतीने मार्केट चालू ठेवावे. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची मार्केट असोशिएशनने दक्षता घ्यावी. अन्यथा कोविड नियमांचे पालन केले नाही तर संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शिवाय संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशाराही आयुक्त पाटील यांनी यावेळी दिला आहे.
दुकानात गर्दी झाल्यास दुकानदारावर कारवाई
करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या सर्व नियमांचे प्रत्येकाने तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे आदी नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानधारकांवर संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत कारवाई करण्यात येईल. तसेच ते दुकान तात्काळ सील केले जाईल. शिवाय त्या दुकानधारकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
लसीकरणासाठी 50 केंद्र सुरू करणार
आयुक्त पाटील यांनी सांगितले की, करोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूीवर सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शहरात लसीकरण सुरू आहे. करोना लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याने शहरात विविध ठिकाणी 50 केंद्र सुरु करण्यात येणार आहेत सर्व ज्येष्ठ नागरिक (60 वर्षावरील) व दुर्धर आजार असणाऱ्यांनी (45 वर्ष वयावरील) लसीकरण करुन घ्यावे.