नगर (प्रतिनिधी) – चिचोंडी पाटील येथील एका तरुणाने गावठी पिस्तुलातून स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. मात्र, त्याच्याकडे गावठी कट्टा आला कुठून व त्याने का आत्महत्या केली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत.
उद्धव राजेंद्र ठोंबरे (वय-24 रा. चिंचोडी पाटील ता. नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी (दि.10) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मृत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला होता.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठोंबरे याच्याकडे गावठी पिस्तूल होते. गोळी मारून घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, उद्धव याच्याकडे गावठी पिस्तूल कुठून आले. त्याने कोणत्या कारणातून स्वत: वर गोळी मारून घेतली याबाबत तपास सुरु आहे.
उद्धव ठोंबरे हा आजाराने पिडीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याने गोळी झाडून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक आंदाज आहे. मात्र, त्याच्याकडे गावठी कट्टा आला कुठुन व आत्महत्या का केली याबाबत तपास सुरु आहे.
युवराज आठरे
प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक