न्यूयॉर्क : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांची पत्नी सोफी यांनी आपल्या सुखी संसारातून वेगळे होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान ट्रूडो यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अधिकृतरीत्या ही घोषणा केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. याविषयी माहिती देत, जस्टिन ट्रूडो आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोटाच्या कायदेशीर करारावर स्वाक्षरी केली असल्याचे म्हटले आहे. या जोडप्याने 18 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये या घटस्फोटाचा उल्लेख केला आहे.”सोफी आणि मी हे सांगू इच्छितो की, अर्थपूर्ण आणि कठीण संभाषणानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत राहून आणि आमच्या कुटुंबासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहू. आमच्या निर्णयाचा आदर करून सर्वजण आमच्या आणि आमच्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्य आणि गोपनीयतेचा आदर करावा, ही अपेक्षा.” सोफी ट्रूडो यांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासारखीच पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘कॅनडाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, “त्यांनी वेगळे होण्याच्या निर्णयासंदर्भात सर्व कायदेशीर आणि नैतिक पावले उचलली आहेत. पुढेही हे करत राहतील.”
जस्टिन ट्रूडो 51 वर्षांचे आणि तर सोफी 48 वर्षांच्या आहेत. 2005 च्या अखेरीस जस्टिन ट्रूडो आणि सोफी यांचं लग्न झाला होतं. त्यांना तीन मुले आहेत. ते 18 वर्षांपासून एकत्र होते आणि आता त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.