नवी दिल्ली – महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील एका गावात स्वाइन फ्लूची काही प्रकरणे समोर आली आहेत. या नव्या विषाणुमुळे शंभरपेक्षा अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिसर आता बंद करण्यात आला असून येथे तपासणी सुरू करण्यात आली आहे. आफ्रिकन स्वाइन फ्लूची शक्यता ध्यानात घेता आरोग्य विभागाने अलर्ट जाहीर केला आहे.
गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर म्हसावद हे गाव असून तेथे ही प्रकरणे आढळून आली आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यामध्ये हे गाव असून शंभरपेक्षा जास्त डुकरांचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
भोपाळ येथील प्रयोगशाळेत नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अचानक उदभवलेल्या फ्लूमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. लगतच्या दहा किमी परिसरात आता काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात विसनगर या गावात स्वाइन फ्लूने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ५२ वर्षीय या व्यक्तीला स्वाइन फ्लू झाला होता यावर प्रयोगशाळेतील तपासणीतही शिक्कामोर्तब झाले आहे.
मात्र त्याची माहिती कळवण्यात आली नाही त्यामुळे संबंधितांना आता नोटीस जारी करण्यात आली आहे. मेहसाणा जिल्ह्यातच आता आणखी २४ संशयित रूग्ण आढळून आले आहेत. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना फ्लूचा अधिक धोका असतो. याखेरीज फुफ्फुसाचे आजार, मधुमेह आणि स्थूल व्यक्तींनाही याचा अधिक धोका असतो.