गुवाहाटी : देशात कोरोना बाधितांचा आकडा 40 हजारांच्या वर गेला आहे. संपूर्ण देशात कोरोनाचे संकट कमी होते कि काय म्हणून आता देशावर आणखी एक नवे संकट आले आहे. देशात पहिल्यांदाच आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. आधीच कोरोनाचे सावट आणि आता आफ्रिकी स्वाईन फ्लू अशा दोन गंभीर आजारांचा भारतात शिरकाव झाला आहे. आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला आहे.
आसाम सराकारने रविवारी सांगितले की, राज्यात आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. यामुळे 306 गावांमधील 2500 हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाला आहे. आसामधील पशुपालन आणि पशु चिकित्सक मंत्री अतुल बोरा यांनी याविषयी माहिती दिली.केंद्र सरकारने डुक्करांना मारण्याची मंजुरी दिल्यानंतरही राज्य सरकार त्यांना मारण्याऐवजी आफ्रिकी स्वाईन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग शोधणार आहे.
आसामधील पशुपालन आणि पशु चिकित्सक मंत्री अतुल बोरा यांनी बोलताना सांगितलं की, आफ्रिकी स्वाईन फ्लूचा कोरोना व्हायरसशी काहीही संबंध नाही. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्था (एनआयएचएसएडी) भोपाळने हा आफ्रिकी स्वाईन फ्लू (एएसएफ) असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने आम्हाला सांगितले आहे की, देशात या आजाराने पहिल्यांदाच शिरकाव केला आहे.’