#CWC19 : पहिल्या विजयासाठी अफगाणिस्तान उत्सुक; विंडीजचाही विजयाचा निर्धार

स्थळ-हेडिंग्ले, लीड्‌स
वेळ- दुपारी 3 वा.

लीड्‌स -अफगाणिस्तानने भारत, पाकिस्तान ब श्रीलंका या संघांविरूद्ध दिलेली झुंज लक्षात घेता या स्पर्धेतील शेवटच्या लढतीत विजय मिळविण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांना येथे आजच्या सामन्यात त्यांना वेस्ट इंडिजच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. दोन्ही संघांचा हा अखेरचा सामना असल्यामुळे विजयी सांगता करण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.

हरारे येथे गतवर्षी झालेल्या पात्रता स्पर्धेत अफगाणिस्तानने ख्रिस गेल, कार्लोस ब्रेथवेट, शाय होप यांचा समावेश असलेल्या वेस्ट इंडिजचा दोन वेळा पराभव केला होता. त्याचा त्यांना मानसिक फायदा मिळणार आहे. प्रतिस्पर्धी संघांना अखेरपर्यंत लढत आपल्या संघास दुय्यम मानणे चुकीचे आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांच्या अनुभवात ते कमी असल्यामुळेच त्यांना येथील स्पर्धेत विजयाची संधी साधता आली नव्हती. तसेच अव्वन कामगिरी करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या व्यावसायिक

दृष्टीकोन व परिपक्‍वता याच्या अभावामुळे ते येथे चांगले यश मिळवू शकले नाहीत. त्यांच्या मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान व रशीद खान यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. आजही त्यांच्याकडून त्याच कामगिरीची अपेक्षा आहे. इक्रम अलिखिल, अझगर अफगाण यांच्यावरही त्यांची फलंदाजी अवलंबून आहे. गोलंदाजीत नबी, रशीद व गुलाबदीन नईब हे किती प्रभाव दाखवितात यावर त्यांचे यश अवलंबून आहे.

वेस्ट इंडिजने 1975 व 1978 मध्ये विश्‍वचषक जिंकला होता. येथे त्यांना सलग सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. न्यूझीलंड व श्रीलंका यांच्याविरूद्धच्या सामन्यांमध्ये त्यांना विजयाने हुलकावणी दिली होती. लंकेविरूद्ध निकोलस पूरन याने केलेले शतक हा चर्चेचा विषय ठरला आहे. क्रिकेट क्षेत्रात एकेकाळी हुकमत गाजविणाऱ्या व्हिव्हियन रिचर्डस, रिची रिचर्डसन, रोहन कन्हाय आदी श्रेष्ठ फलंदाजासारखे नैपुण्य त्याच्याकडे आहे याची झलक त्याने दाखवून दिली आहे. फॅबियन ऍलन या युवा खेळाडूकडे विलक्षण कौशल्य आहे याचा प्रत्यय दिसून आला आहे. आज त्यांच्यावर मोठी भिस्त आहे. त्यांच्याप्रमाणेच कर्णधार जेसन होल्डर, ख्रिस गेल, कार्लोस ब्रेथवेट यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. गोलंदाजीत शेल्डॉन कॉट्रेल, ओशाने थॉमस, ब्रेथवेट हे किती प्रभाव दाखवितात याची उत्सुकता आहे.

प्रतिस्पर्धी संघ-

अफगाणिस्तान : गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अझगर अफगाण, दौलत झारदान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झईझई, मोहम्मद नबी, इक्रम अलिखिल (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीब उल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमोरन हेटमेयर, शाय होप, एल्विन लुईस, अशले नर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), केमार रोच, सुनील ऍम्ब्रीस, ओशाने थॉमस.

Leave A Reply

Your email address will not be published.