अश्‍व दौडीने झाला चांदोबाचा पहिला रिंगण सोहळा

उभे रिंगणाचा सोहळा… साठवूनी पाहती डोळा…

प्रशांत ढावरे

रांगोळ्या, फुगड्या आणि फेरही…


यावेळी परिसरात सुरू असलेला नामघोष आणि महिला- पुरुषांनीही बेभान होऊन घातलेल्या फुगड्या अणि फेर धरून येथे स्वर्ग सुखाचा सोहळाच सुरू केला. रिंगणाच्या जागेत सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या. रिंगण सोहळा आटपून विविध खेळ खेळून पुन्हा अलोट उत्साहाने न्हालेले वारकरी तरडगावच्या दिशेने मुक्कामासाठी निघाले.

लोणंद  – उभे रिंगणाचा सोहळा… साठवूनी पाहती डोळा… लीला करी अश्‍व भोळा…अश्‍व दौडीने संपन्न झाला चांदोबाचा पहिला रिंगण सोहळा. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास फलटण तालुक्‍यातील तरडगावजवळील चांदोबाचा लिंब येथे पार पडले. नयनरम्य सोहळा पार पडताना अश्‍वांच्या नेत्रदीपक दौडीने, वारकऱ्यांच्या भक्तीपूर्ण वातावरणात, टाळ मृदुंगाच्या गजरात “माउली, माउली, आणि ग्यानबा, तुकाराम…’ असा गगनभेदी जयघोष ऐकायला मिळाला. वारकऱ्यांनी या क्षणाने अध्यात्मिक मेजवानीचा आनंदच लुटला. भक्ती, शिस्त आणि अनुशासनाचा मूर्तीमंत सोहळा या रिंगणावेळी अनुभवायला मिळाला. हे उभे रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

माउलींचा पालखी सोहळा लोणंद येथे मंगळवारी सायंकाळपासून दीड दिवसांसाठी विसावला होता. बुधवारी सकाळी लोणंद येथे पालखीतळावर राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरासह अनेकांनी माउलींचे दर्शन घेतले. दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर माउलींचा पालखी सोहळा तरडगावकडे निघाला. खंडाळा तालुक्‍यातून फलटण तालुक्‍यात प्रवेश करताना सरदेचा ओढा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत फलटण तालुक्‍यात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर पालखीचा मानाचा नगारखाना चांदोबाचा लिंब येथे आला. परिसरात माउलींचा चांदीचा रथ पोहचल्यावर सर्व दिंड्या आहे, त्या जागी थांबविण्यात आल्या. सर्व दिंड्यातील वारकऱ्यांनी दोन्ही बाजूने उभे रहात रिंगणासाठी माउलींचा जयघोष सुरू केला. “याची देही याची डोळा’ रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. चोपदारांनी उभे रिंगण करण्यासाठी जागा पाहणी केल्यावर पालखी सोहळ्यापुढे असणारे दोन अश्‍व ज्यात एकावर स्वत: माउली स्वार असतात. तर दुसरा शितोळे सरकारांचा आळंदी संस्थानच्या अश्‍वावर चोपदार हातात झेंडा घेऊन बसलेला असतो. चोपदारांनी दंड उंचावून इशारा दिल्यावर या दोन्ही अश्‍वांनी वेगाने दौड घेत रथापुढील 27 व रथामागील 20 दिंड्यांपर्यंत जाऊन पुन्हा ते माउलींच्या रथापर्यंत आले.यावेळी त्यांना नैवैद्य भरविण्यात आला. त्यानंतर पुन्हा अश्‍वांनी एकमेकांशी स्पर्धा करीत वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर अश्‍वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी
एकच अलोट गर्दी उसळली.

Leave A Reply

Your email address will not be published.