मेल न येण्याच्या व न जाण्याच्या तक्रारी…
नवी दिल्ली – गुरुवारी सकाळपासून जी- मेल सेवा वापरताना काही अडचणी येत असल्याच्या तक्रारी कंपनीकडे आल्या आहेत. यासंदर्भातील शहानिशा चालू असून सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गुगलने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
सकाळपासून काही वापरकर्त्यांना लॉग इन करता येत नव्हते. त्याचबरोबर काहींची इन्कमिंग मेले येत नव्हती. बऱ्याच जणांना लॉगइन करता आले नसल्याचे आढळून आले. आम्ही हा परिणाम कशामुळे झाला आहे याची चौकशी करीत आहोत. किती जणांच्या मेलवर परिणाम झाला हे मात्र कंपनीने आणखी सांगितलेले नाही.
मेलवर परिणाम झाला आहे, आम्ही सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहोत असा संदेश अनेकांना जी-मेलच्या डॅश बोर्डवर सकाळी आला. दुपारी दोन वाजता व नंतर तीन वाजता अशाच प्रकारचा संदेश काही ग्राहकांना आला.
कंपनीने म्हटले आहे की, गुगल ड्राईव्ह, गुगल डॉक्स, गुगल मॅप सेवावरही परिणाम झाला आहे. नेमका किती ग्राहकांच्या सेवेवर परिणाम झाला आहे हे कंपनीने सांगितले नसले तरी भारतासह अनेक देशांतील गुगल जी-मेल वापरणाऱ्या लोकांवर याचा परिणाम झाला असल्याचे दिसून येते. बऱ्याच वापरकर्त्यांनी ट्विटरवर आमच्या जी- मेल सेवेवर परिणाम झाला असल्याचे सांगितले आहे.