करोनाबाधित अश्रफना मदतीची प्रतीक्षा
मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांना हवी तशी बॅट घडविणारे अश्रफ चौधरी सध्या हालाखीत दिवस कंठत आहेत. सध्या क्रिकेट ठप्प असल्याने तसेच उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे.
वानखेडे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने तसेच आयपीएलसह देशांतर्गत सामन्यांदरम्यान अनेकदा अश्रफ चौधरी उपस्थित राहायचे. त्यांच्याकडे विविध प्रकारच्या बॅट तसेच ग्रीप्सही असायच्या. अश्रफ यांनी सचिन आणि विराटसाठीच नाही तर, परदेशी खेळाडूंसाठीही त्यांना हवी तशी बॅट बनवून दिली आहे. आज अश्रफ यांनी वयाची सत्तरी पार केली असून सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना येथील एका रुग्णालात दाखल करण्यात आले असून त्यांना करोना झाल्याचेही उघड झाले आहे.
अश्रफ यांच्या उपचारासाठी निधी जमा करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेतील अनेक सदस्य पुढाकार घेत आहेत. त्यांना करोनाचा त्रास तर आहेच त्याचबरोबर किडनी स्टोनचाही त्रास होत आहे. करोनामुळे देशातील क्रिकेट ठप्प असल्याने त्यांच्या व्यवसायालाही घरघर लागली आहे. जी काही गंगाजळी होती, ती देखील संपली असून मदत करण्यासाठी कोणी पुढे येणार का? याची ते प्रतीक्षा करत आहेत. संघटनेशी संबंधित प्रशांत जेठमलानी यांनी पुढाकार घेतला असून काही निधी जमा झाला असला तरीही तो पुरेसा नाही. कधीकाळी अनेक खेळाडूंना त्यांनी परिस्थिती बिकट असली तरी मोफत बॅट दिल्या आहेत. मात्र, ज्या सचिन किंवा विराटसाठी त्यांनी बॅट तयार केल्या त्यांच्यासारख्या अनेक खेळाडूंचे त्यांच्याकडे होत असलेले दुर्लक्ष त्यांना सलत आहे.