मंचर, (प्रतिनिधी) – कळंब (ता. आंबेगाव) येथे कळंब ग्रामपंचायत चौकामध्ये डोंबारी समाजाच्या कुटुंबाने पारंपरिक कला जोपासत अतिशय हृदय द्रावक खेळ सादर केले.दोन्ही बांबूच्या बाजूला बांधलेल्या दोरीवरी चढत खेळ लहान मुलींनी सादर करून उपस्थिताची वाहवा मिळवली.
यावेळी डोंबारी समाजातील दोन्ही लहान मुलींनी बांबूला दोन्ही बाजूने बांधलेल्या दोरीवर चढत डोक्यावर तांब्या कळशी घेऊन हातामध्ये बांबू घेऊन रस्सीवर जीव मुठीत धरून गाण्याच्या ठेक्यावर नृत्य केले. तसेच हातामध्ये दोन्ही बाजूला दोन झेंडा हातात धरून रस्सीवर पायामध्ये थाळी धरून चालून दाखवले.
याला रसिक प्रेक्षकांनी दाद देत गरीब समाजातील डोंबारी कुटुंबाच्या मुलांना बक्षीस देत टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. डोंबारी समाजातील कुटुंबे गावोगाव दुचाकीवर आपला संसार घेऊन फिरत कुटुंबाची उपजीविका वर्षानुवर्ष चालवत आलेले आहेत. ही पारंपरिक कला डोंबारी समाजातील कुटुंबामुळे आजही नागरिकांना पहावयास मिळत आहे. तरी अशा होतकरू मुलामुलींना प्रत्येक गावातील नागरिकांनी प्रोत्साहन देत बक्षीस देणे गरजेचे आहे.असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.