पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमांना व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी कमाल शुल्काची रक्कम जाहीर करण्यात आली. त्यापेक्षा अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या शिक्षण संस्थांच्या विरोधात “डोनेशन’ घेतल्याचा ठपका ठेवले जाईल आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शुल्क नियामक प्राधिकरणकडून (एफआरए) देण्यात आली.
एमबीबीएस, बीडीएस, एमडी, एमएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी वैद्यकीय महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारण्यात येत आहे. याबाबतच्या तक्रारी “एफआरए’ला प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलने “एफआरए’कडे विचारणा करीत शुल्काबाबत माहिती प्रसिद्धी करण्याची मागणी केली. त्यानंतर “एफआरए’ने व्यवस्थापन कोटा आणि एनआरए कोट्याच्या शुल्काची माहिती प्रसिद्ध करण्यात आली.
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतांना विद्यार्थ्याला अधिकाधिक तीन पट शुल्क भरावे लागेल. एमडी, एमएस, एमडीएस यांच्यासह अन्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेशासाठी विद्यार्थ्याला अधिकाधिक चार पट शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना एनआरआय कोट्यातून प्रवेशासाठी अधिकाधिक पाच पट शुल्क भरावे लागणार आहे. यापेक्षा अधिक शुल्क कॉलेजांना आकारता येणार नाही, असेही “एफआरए’ने स्पष्ट केले आहे.