सातारा – श्री यमाई देवी गुरव सेवाधारी समाजाने दिपावली निमित्त गोरगरीबांना वस्त्रे दान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, असे प्रतिपादन सातारच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त चंदाताई ढबाले यांनी केले.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये झोपडपट्टी फूटपाथवर राहणाऱ्या लोकापर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न दीपावलीच्या शुभपर्वात धनत्रयोदशी व शिवप्रताप दिनादिवशी श्री यमाई देवी गुरव सेवाधारी समाजाने केला. चंदाताई ढबाले यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त गुरव समाज श्री यमाई देवी सेवाधारी हक्कदार औंध यांच्यावतीने औंधच्या श्री यमाई(भवानी )देवीस अर्पण केलेली वस्त्रे प्रसादरूपामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून गरजू गोरगरिबांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.अनेक गोरगरीब परिस्थितीमुळे दिवाळीतही अत्यंत हलाखित जीवन जगत असतात.
अशा लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचा एखादा किरण दिसावा यासाठी धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य व सहा. धर्मादाय आयुक्त सातारा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत औंध येथील श्री यमाई देवी पुजारी,गुरव समाज एकत्र आला. त्यांनी या गरिबांच्या घरी आनंदाचा क्षण यावा म्हणून वस्त्रदानाचा उपक्रम राबवला. दिवाळीपूर्वी औंध गावांमध्ये तसेच धनत्रयोदशी दिवशी सातारा शहरातील झोपडपट्टी व फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना वस्त्रदान करण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्ट फेडरेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष विजयकुमार पोरे, औंध येथील श्री यमाई देवीचे पुजारी राजेंद्र बाळकृष्ण गुरव,संदीप गुरव, हणमंत गुरव,अवधूत पछाडे,तेजस गुरव,अमोल गुरव रमेश,उत्तम सातभाई,शैलेंद्र आमले,प्रसाद सातभाई, सामाजिक कार्यकर्ते सुमीत नाईक आदी उपस्थित होते. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील येथील श्वेता हमने,श्री जाधव. श्री. पोरे श्री. माने, सौ. बाइस्कर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान श्री यमाई देवी गुरव सेवाधारी समाज यांनी अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले आहेत .गोरगरिबांना अन्नदानाचा उपक्रम,करोना काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारा आरसेनिक अल्बमचे वाटप,औषधोपचार व जीवनावश्यक वस्तू भेट ,पोलीस यंत्रणा, आशा वर्कर, फ्रंट वॉरियर लोकांना मास्क,सॅनिटायझर, सुकामेवा यांचे वाटप, कोविड सेंटरला सुसज्ज बेडची मदत, वृक्षदान,धार्मिक माहितीचा प्रसार, मंदिरातील नित्यसेवेत मदत करणाऱ्या लोकांना दरवर्षी वस्त्र वाटप असे विविध उपक्रम राबवले आहेत.