जुन्नर दि.१४ वार्ताहर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. कुठे रक्तदान शिबीर तर कुठं शासकीय योजनाची माहिती असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होण्याचा आनंद सर्वत्र असताना देशाचे भविष्य म्हटले जाणाऱ्या बालकांना मात्र विविध अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
जुन्नर नगर पालिकेच्या दिल्लीपेठ येथे असणारी अंगणवाडीची दुरावस्था झाली असून प्रशासनाचे मात्र पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अंगणवाडी च्या शेजारी असलेल्या शौचालय दुरुस्ती साठी लाखो रुपये खर्च केले जात असताना बाजूलाच असलेल्या अंगणवाडी कडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
ही अंगणवाडी जुन्नर नगर पालिकेच्या महात्मा फुले समाज मंदिरात भरत आहे. या इमारतीच्या छतामधून पावसाचे पाणी ठिपकत असून मुले बसणारी फरशी वर पाणीच पाणी साठत आहे. सदर इमारतीचे छत धोकादायक झाले आहे. त्याच प्रमाणे खिडक्याच्या काचा फुटल्या असून विजेचे बोर्ड देखील उघडे असून लटकलेल्या अवस्थेत आहेत. इमारतीच्या स्लॅब चा भाग कोसळून किंवा विजेचा प्रवाह पाण्यामध्ये उतरून दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी जुन्नर नगर पालिका प्रशासन घेणार का असा सवाल स्थनिक नागरिक उपस्थित करत आहे.
येथील अंगणवाडी सेविका यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार विनंती अर्ज करून देखील त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे अंगणवाडी सेविका थोरात यांनी सांगितले.
या अंगणवाडी मध्ये शून्य ते ३० वयोगटातील ८० मुले असून त्यांना सकाळी पोषण आहार दिला जातो तर ३ ते ५ वयोगटातील ३० मुले येत असल्याची माहिती अंगणवाडी सेविका मंदा थोरात यांनी दिली.अंगणवाडी सेविका थोरात या मागील २५ वर्षांपासून कार्यरत असून शुभांगी शेरकर या मदतनीस आहेत.
प्रशासनाच्या कार्यपद्धती बाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गोर गरिबांच्या मुलांनी अशा धोकादायक वातावरणात कसे शिक्षण घ्यावे असा प्रश्न उपस्थित केला. नगर पालिका प्रशासनाने त्वरित या अंगणवाडी ची दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयवंत शेटे, नितीन शेरकर, रोहित नांगरे, हर्षल शेटे, रोहन भास्कर, प्रशांत शेटे यांनी केली आहे.