पुणे – “देशातील बॅंका बुडू नयेत, यासाठी छोट्या सहकारी बॅंकांना बड्या राष्ट्रीयीकृत बॅंकांप्रमाणे तंत्रज्ञान, व्यवस्थापन आदी संसाधने उपलब्ध करून दिली पाहिजेत. सहकारी बॅंकांची समाजाप्रति बांधिलकी आणि नात्यांचा फायदा घेत, त्यांचे सक्षमीकरण केल्यास नवीन समाजरचना निर्माण होण्यास मदत होईल,’ असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. समाजाचा तळागाळापासून विकास करण्यासाठी सहकारी बॅंकांची गरज असून, त्यांच्या वृद्धीसाठी सरकार आणि समाजाने मदत करावी, असे आवाहनही डॉ. प्रभू यांनी केले.
“भगिनी निवेदिता सहकारी बॅंके’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभानिमित्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या (सीओईपी) सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, बॅंकेच्या अध्यक्षा डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा दीपा दाढे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात बॅंकेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणारी चित्रफीत तसेच या वाटचालीची अक्षर रुपात माहिती देणारे “सुवर्ण भरारी’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन, पैठणकर यांनी प्रास्ताविक केले. देशपांडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली, तर दाढे यांनी आभार मानले.
समारंभातील क्षणचित्रे…
कार्यक्रमाला सहकार आयुक्त अनिल कवडे, बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, रिझर्व बॅंक संचालक मंडळ सदस्य सतीश मराठे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
बॅंकेचे अनेक खातेदार आणि ठेवीदारही आवर्जून उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय.
बॅंकेच्या 50 वर्षांच्या वाटचालीची ध्वनीचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. याचे साक्षीदार राहिलेले खातेदार यावेळी उपस्थित होते. हा प्रवास डोळ्यांसमोरून तरळून गेल्याने ते भारावले.
भगिनी निवेदिता बॅंकेबद्दल गौरवोद्गार
“भगिनी निवेदिता बॅंकेचा आर्थिक आलेख पाहताना ढोबळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण केवळ दोन टक्के; तर निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण शून्य टक्के आहे. बड्या बॅंकांना जमले नाही आणि जमत नाही, अशी कामगिरी या बॅंकेने करून दाखवली आहे, असे गौरवोद्वार डॉ. अजित रानडे यांनी यांनी यावेळी काढले.
भगिनी निवेदिता बॅंकेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार : डॉ. अजित रानडे
“भगिनी निवेदिता बॅंकेचा शिस्तबद्धपणा वाखाणण्याजोगा आहे. मायक्रो फायनान्स क्षेत्र विकसित नसल्याच्या काळात महिलांची सहकारी बॅंक उभी करणे आणि आतापर्यंत यशस्वी वाटचाल करणे प्रशंसनीय आहे. जगात बॅंकिंग क्षेत्रात अस्थिरता आहे. बऱ्याच बॅंक बुडाल्या. त्याचा बोजा करदात्यांवर येत आहे. “बॅंकिंग विथ कॉन्शस’ आणि “इथिक्स’ आवश्यक आहे. या विश्वासाला तडा गेल्यास “सिलिकॉन व्हॅली बॅंक’ होऊ शकते. भगिनी निवेदिता बॅंकेकडून सूक्ष्म लघु आणि महिला उद्योगांना कर्ज पुरवठा केला जात असल्याने अर्थव्यवस्थेला हातभार लागत आहे,’ असे मत डॉ. अजित रानडे यांनी व्यक्त केले.
“भगिनी निवेदिता सहकारी बॅंके’ची प्रगती नेत्रदीपक, गौरवास्पद : डॉ. सुरेश प्रभू
“भगिनी निवेदिता सहकारी बॅंके’ची प्रगती नेत्रदीपक असून, पुढील वाटचालही भव्यदिव्य असेल याची खात्री आहे. “टेलिबॅंकिंग’ आल्यावर बॅंक आणि ग्राहक यामध्ये अंतर निर्माण होत आहे. पण, आता “भगिनी निवेदिता’ बॅंकेविषयी विश्वास आहे, म्हणून तिचा आलेख चढता आहे. महिला स्वतःच्या पायावर उभी राहिल्यास आत्मविश्वास निर्माण होतो. त्यातून चांगल्या समाजाची उभारणी होईल. त्याचा फायदा अर्थव्यवस्था वाढीस होईल. पुरुषप्रधान संस्कृतीऐवजी समाज रचना स्त्रियांनी चालवल्यास अनेक प्रश्न सुटतील. विषमतेवर तोडगा निघू शकतो.
माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर म्हणाल्या…
महिलांना अर्थकारण समजत नाही, हा गैरसमज असल्याने बॅंकिंग व्यवहारात महिलांचा सहभाग वाढलेला नाही. देशाच्या अर्थमंत्री महिला आहेत. महिला कमावत्या झाल्या, गुंतवणूक करू लागल्या आहेत. तरीही त्यांचा बॅंकिंग व्यवहाराशी संबंध येत नाही. न्यायालयात खरेच न्याय मिळतो का अशी विचारणा होते. पण, कायदा हे शरीर आणि न्याय हा आत्मा असतो. तसाच “विश्वास’ हा बॅंकेचा आत्मा असून तो कायम ठेवाल, अशी अपेक्षा भाटकर यांनी व्यक्त केली.