रशियन युनिव्हर्सिटीची हृदयरोगतज्ज्ञ पदवी प्रदान
मंचर – जिद्द असेल तर कुठले ध्येय अशक्य नाही हे दाखवून दिले आहे खेड तालुक्यातील ठाकर समाजाच्या आदिवासी मुलीने. डॉ. स्नेहा सुरेश पारधी (वय 24, रा. रानमळा, रामनगर) या तरुणीने रशियात एम. डी. (हृदयतज्ज्ञ) पदवी प्राप्त केली आहे. या यशाबद्दल घोडेगाव येथे मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
स्नेहा पारधी हिचे वडील सुरेश बबन पारधी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडे बुद्रुक येथे प्राथमिक शिक्षक असून, आई विद्या पारधी अंगणवाडी सेविका आहे. स्नेहाचे प्राथमिक शिक्षण वाकी खुर्द येथील इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले, तर अकरावी, बारावी महात्मा गांधी विद्यालय राजगुरूनगर (ता. खेड) येथे झाले. 2016 मध्ये बारावीनंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ती रशियात गेली.
तेथील ऑरेंजबर्ग मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये सहा वर्षे शिक्षण घेऊन तिने एमबीबीएस, एमडी पदवी प्राप्त केली. तिचे आजोळ असलेल्या पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथे तिचे कौतुक करण्यात आले, तसेच घोडेगाव येथे जिल्हा परिषद गट नेते देविदास दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, चिखलीच्या सरपंच अनिता आढारी, खंडू खंडागळे, बबन काळे यांनी तिचा सत्कार करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ठाकर समाजाच्या मुलीने डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून परदेशात जाऊन आमचे स्वप्न पूर्ण केले याबाबत आम्हाला तिचा अभिमान असून समाजाच्या इतर मुलींनी देखील याचा आदर्श घेऊन उच्चशिक्षण घेऊन आपले कुटुंबाचे, गावाचे, देशाचे, नाव उज्वल करावे, असे स्नेहाच्या वडिलांनी सांगितले.