पिंपरी -मित्र जेवण करण्यासाठी लवकर आला नाही म्हणून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी मोशी येथे उघडकीस आली.
सुलोचना नामदेव लेकुडवार (वय 30, रा. गायकवाड वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना यांच्या पतीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्या लातूरहून पिंपरी चिंचवड शहरात आल्या. येथे त्या हाऊस किपिंग आणि जेवण बनविण्याचे काम करीत होती.
त्यांना चार मुली असून त्या गावाकडे शिकण्यास आहेत. पिंपरी चिंचवड शहरात काम करीत असताना एका परप्रांतीय व्यक्तीशी मैत्री झाली होती. लवकरच ते लग्नही करणार होते. ते सध्या वेगवेगळे राहत होते मात्र जेवण एकत्र करीत असत. बुधवारी रात्री सुलोचना यांनी जेवण तयार केले. मात्र तो जेवणासाठी लवकर आला नाही. या कारणावरून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी सकाळी पोलिसांना वायसीएम रुग्णालयातून मृत्यूबाबत खबर आली होती.