देऊळगावराजे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत रविवारी (दि. 22) दौंड तालुक्याच्या पूर्वभागत जनता कर्फ्यूचे समर्थन करत नागरिकांनी ग्रामिण भागातही पालन करण्यात आले. गावातील चौक, दुकाने आणि रस्ते सुनसान दिसत होते. प्रत्येकजण घरात आपल्या कुटुंबासोबत बसले होते. त्याचप्रमाणे सिद्धटेकला जाणारी नेहमीच्या वाहनांची वर्दळ सकाळपासून थांबली होती.
करोना व्हायरसची दहशत आता ग्रामीण भागातसुद्धा निर्माण झाली आहे. करोना रोगाचा नायनाट होण्यासाठी ग्रामस्थांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. करोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यानुसार रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी, जर सर्दी. ताप, खोकला, घशाचा त्रास होत असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक राजगे यांनी केले आहे.