बॉलीवूड ऍक्टर अदा शर्माला आता लग्न करण्याचे वेध लागले आहेत, तिने आपल्याला अपेक्षित जोडीदाराचे गुणही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या गुणांच्या निकषांमध्ये बसणाऱ्या युवकाने आपला नवरा बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे उघड आवाहन आदाने केले आहे. या अफलातून कल्पनेबद्दल अदाचे खूप कौतुक केले जात आहे.
तिच्या नवऱ्याकडून असलेल्या अपेक्षा व्हायरल झाल्या आहेत. तो कांदा खाणारा नसावा, ही प्रमुख मागणी आहे. याव्यतिरिक्त जात, वर्ण, धर्म, बुटांचा साईज, व्हिसा, पोहणे येते की नाही, बायसेपचा आकार, इंस्टाग्रामवरच्या फॉलोअर्सची संख्या आणि पत्रिकेला तिने अजिबात महत्त्व दिलेले नाही. नवऱ्याला दिवसातून तीन वेळेला स्वयंपाक करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. हे करतानाही त्याने आपला चेहरा सतत हसतच ठेवला पाहिजे. घरांमध्ये आणि बाहेर त्याला जीन्स घालायची परवानगी असेल. मात्र सार्वजनिक ठिकाणी त्याला पारंपारिक भारतीय कपडे घालावे लागतील. त्याला दररोज पिण्यासाठी पाच लिटर पाणी दिले जाईल. मात्र मद्यप्राशन आणि मांसाहार घराच्या परिसरात पूर्णपणे निषिद्ध असेल. त्याने सर्व भारतीय भाषांबद्दल आदर दाखवला पाहिजे आणि सर्व भाषांचे सिनेमे बघितले पाहिजेत, असेही अदाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अदा शर्मा तमिळ आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. “कमांडो 3′, “बायपास रोड’ आणि “मॅन टू मॅन’ यासारखे सिनेमे तिने केले आहेत. प्रभुदेवाच्या “चार्ली चॅप्लिन’ या सिनेमात तिने लीड रोल केला आहे. “इधू नम्मा आलू’ या तामिळ सिनेमात तिने केलेले आयटम्स सॉंग खूप पॉप्युलर झाले होते. तिच्या या आवाहनाकडे बघता राखी सावंतच्या स्वयंवरची आठवण होते.