हनोई : व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये अपार्टमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत १२ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी रात्री इथले रहिवासी झोपेत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. स्थानिक वेळेनुसार रात्री साडे अकराच्या सुमारास ही आग लागली, पहाटे दोन वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, अशी माहिती व्हिएतनामच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
हनोईच्या नैऋत्यकडील निवासी भागात असलेल्या अरुंद गल्लीत असलेल्या नऊ मजली अपार्टमेंटमध्ये 150 लोक राहत होते. इमारतीमधील रहिवासी झोपलेले असताना रात्री अचानक आग लागली. यात डझनभर नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. इमारतीमधून सुमारे 70 जणांना वाचवण्यात आले, त्यापैकी 54 जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी अधिकाऱ्यांनी मृतांच्या संख्येची अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. आगीत 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आत आणि बाहेर जाण्यासाठी इमारतीमध्ये एकच मार्ग होता. तसेच या इमारतीत कोणताही आपत्कालीन मार्ग नसल्याने अनेकाना बाहेर पडण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या मदतीने घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले.
मदतीसाठी ओरडण्याचा आवाज आला, परंतु अपार्टमेंट बंदिस्त असल्याने आम्ही त्यांना फारशी मदत करु शकलो नाही, असे एका महिलेने सांगितले. तर आगीपासून वाचण्यासाठी एक लहान मुलाला घरातून खाली फेकल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पोलिसांनी आगीच्या कारणाचा तपास सुरु केला आहे.